अचलपूर: एक प्राचीन शहर
माझं गाव: अचलपूर..!!
अचलपूर..!! माझं गाव.. जेंव्हा मी "इतिहासाच्या पाऊलखुणा" या संदर्भात माहिती संकलित करण्याचे ठरवले, तेंव्हा सहजच सभोवताली नजर फिरवली तर काय..!! माझ्या आजूबाजूला पुरातन वास्तू , जुने आणि तेवढेच भक्कम बांधकाम, नक्षीकाम अश्या सर्व गोष्टींचा खजिनाच होता. आणि मग मी अचलपूर या गावाचा इतिहास Internet वर शोधण्यास सुरुवात केली. तर लक्षात आले की अचलपूर चा संदर्भ आणि या गावाशी निगडित इतिहासातील धागे-दोरे फार पुरातन आहेत, आणि तेवढेच ऐतिहासिक उलाढालींनी भरपूर आहेत.
ढोबळमानाने पहिला असता अचलपूर शहराचा संदर्भ मध्यकाळात विशेषतः ९व्या शतकात मिळतो. इ. सन ९ ते इ. सन १२ या काळात अचलपूर हे जैन संस्कृतीच्या अधिपत्याखाली विकसित झाले होते. त्याआधी ८व्या शतकात काही काळासाठी अचलपूर हे "राष्ट्रकूट घराण्याच्या राजधानीचं ठिकाण होतं. आचार्य जयसिंहसुरी यांनी यांनी इ. सन ९ मध्ये लिहिलेल्या धर्मोपदेशमला या ग्रंथात अचलपूरचे नरेश "अरिकेसरी " यांचा उल्लेख केला आहे.
अजंता-एलोरा च्या गुफा बनवणारा राजा ईल [एल] यानेच अचलपूर शहराभोवती तटबंधी उभारून किल्ल्याचे निर्माण केले आणि अचलपूर ला आपली राजधानी बनवले. {म्हणूनच अचलपूर चे प्राचीन नाव एलिचपूर असेही आहे.}. राजा ईल आणि मुघल सेनापती रहमान शाह दुल्हा यांच्यातील लढाईचे बरेच किस्से विवेकसिंधु नामक ग्रंथात लिहिले आहेत(आज हा ग्रंथ अस्तित्वात आहे कि नाही या बद्दल कल्पना नाही.) या दोघांत झालेल्या घनघोर युद्धात रहमान शाह दुल्हा मृत्युमुखी पडला होता म्हणूनच त्याची मजार परतवाडा-अमरावती रोड वर आज आपल्याला दिसते. [ही मजार आपल्या घराच्या अगदी मागे आहे.] त्याला "जंग-शहेदा" म्हणून देखील ओळखले जाते. सातशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले दुल्हागेट आजही शहराचे वैभव आहे. हे गेट इस्माईल खान या सरदाराने बांधले आहे. दुल्हा रहेमान याच्या दर्ग्याकडे हा रस्ता जात असल्याने गेटचे नाव असे पडले. त्याच्याच बाजूला राजा ईल ची देखील समाधी होती असा म्हणतात पण काळाच्या ओघात ती विस्मरणात गेली आहे. राजा ईल नंतर अचलपूर च्या गादीवर "खरेला राजवंशाचा" राजा जैतपाल हा आला, पण राजा ईल ने आपल्या कार्यकाळात अचलपूर शहराचा खूप विकास केला, गावातील परकोट, बुरुज, तलाव, सुरंगे याच सर्व गोष्टींची साक्ष देतात.
1318 सालापर्यंत अचलपूर हे हिंदू प्रशासनाखाली होतं. 1347 सलामध्ये अचलपूर सह संपूर्ण बेरार परिसर "बहामनी सलतनतिच्या" अधिपत्याखाली आलं. १४९० साली "फात्तूलाह इमाद-उल-मुल्क" याने आपली स्वतंत्र घराणेशाही "इमाद शाही" या नावे घोषित केली आणि "माहूर" पर्यंत आपले राज्य विस्तारित करून अचलपूर ला राजधानी बनवले. त्यानंतर पुन्हा मुघलांनी सत्ता काबीज करेपर्यंत अचलपूर ही बेरार सुब्याची राजधानी होती आणि म्हणूनच आजही येथील काही पुरातन बांधकामात बेरार च्या सुलतानाच्या स्थापत्यशैलीचे अवशेष सापडतात.
१८व्या शतकात मुघल साम्राज्याच्या पतनानंतर, बेरार सहित अचलपूर आहे हैद्राबादच्या निझामाच्या अधिपत्याखाली आले. १८६७ साली पूर्व -बेरार विभक्त होऊन अचलपूर आणि अमरावती अशे दोन स्वतंत्र जिल्हे तय्यार झाले. पण १९०५ साली अचलपूर हे अमरावती जिल्ह्यात विलीन झाले आणि अमरावती हा एकच जिल्हा उदयास आला.
परतवाडा अर्थात "पलटणवाडा" आणि अचलपूर हे जुळे शहरं म्हणून प्रसिद्ध आहेत. परतवाड्यात सुरुवातीला पेन्शनपुरा, गटरमलपूरा, बडा बाजार, छोटा आजार, वकील लाईन, सिव्हिल लाईन असे प्रमुख भाग होते. तर अचलपूरमध्ये एकूण ५२ पुरे (माेहल्ले) आहेत. अब्बासपुरा, सुलतानपुरा, माळवेशपुरा, मोमीनपुरा अशी तत्कालीन मुस्लिम शासकांची नावे या माेहल्ल्यांना आहेत. शहराच्या चारही बाजूंनी तटबंदी आहे; तिच्यात माेठाली प्रवेशद्वारे आहेत.
तर असा आहे माझ्या गावचा फार पुरातन, प्रगल्भ आणि वैभवशाली इतिहास. पण आज लोकांच्या हव्यासापायी, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे, आणि राजकीय नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरातील पुरातन इमारतींचे, येथील भक्कम अश्या परकोट, किल्ल्यांचे जतन करण्यात आम्ही कमी पडलो असे भासते. पण काही ठिकाणी लोखंडी कुंपण घालून शहरातील या पुरातन वास्तूंची निगा राखली जाते आहे यात समाधान आहे.
Namaskar
ReplyDeleteNamaskar
ReplyDelete