तेजस्वि नावधीतमस्तु:
।। तेजस्वि नावधीतमस्तु: ।।
![]() |
| -: सौ. वीणा अनंत भारतीय :- |
"बापरेरेरेरे.....!! आई, तू ५० वर्षांची झालीस ??", असे उद्दगार काढून मी, सायली आणि माई (माझी आई) जोर जोरात हसू लागलो. परवाचीच गोष्ट, पुण्याला येण्यासाठी आम्ही बडनेरा स्टेशनला गाडीची वाट बघत होतो, गाडीला यायला तसा बराच अवकाश होता, आणि बोलता-बोलता नकळतचं आमची एका छान आठवणींच्या सफारीला सुरुवात झाली. अत्तरदणीतुन अत्तराचा वर्षाव होताच जसं मन सुखावतं, अगदी तसाचं एक-एक आठवण, एक-एक किस्सा आठवताना मन प्रफुल्लित होत होतं.
माझी आई म्हणजे माझा प्रेरणास्रोत, माझा विश्वास. ती तिच्या कर्तव्यांमध्ये जितकी प्रामाणिक व प्रखर आहे तेवढीच तिची माया सौम्य व मृदू आहे. कित्तेकदा तिचं प्रेम, दातृत्वं आमच्या समजण्या पलीकडचा असतं. म्हणतातना की दातृत्वं, मृदू भाषा, या शिकून येत नाहीत, तर त्या जन्मजात असाव्या लागतात.
"दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता ।
अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वारः सहजा गुणाः ॥ "
गेल्या २८ वर्ष्यांच्या माझ्या आयुष्यात काही तीव्र चढाव-उतार आलेत, त्यांत माझी आई माझी काठी आणि माझी हिंमत बनून खंबीर पणाने माझ्या पाठीशी उभी होती. आणि लढण्याचे सामर्थ्य मला देत होती.
माझी आई "आवडीने" शिक्षिका आहे (मी "व्यवसायाने" यासाठी नाही बोललो कारण, जिथे व्यवसाय आला, तिथे हेवे-दावे आलेत), लहान मुलांप्रती तिची माया व प्रयोगशिलता सर्वचर्चित आहेच, शाळेतील मुलांसाठीचे तिचे उपक्रम, सांस्कृतिक विषयांचे त्यांना ज्ञान मिळावे यासाठीची तिची नेहेमीच धडपड असते, तसेच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या एकाच उद्देशाने ओतप्रोत तिचे कार्य असते.
मुलांना शिकवता-शिवकता स्वतःही शिकण्याचा तिचा अट्टाहास वखडण्याजोगा आहे. आधी BA-कीर्तनशास्त्र (विद्यापीठ प्राविण्य), मग B.ed(९०% नी उत्तीर्ण) असे एकाहून एक शैक्षणिक शिखरं पादाक्रांत करून तिने आम्हास सदैव स्फूर्ती दिली आहे. असे एक ना अनेक आनंददायी, गहिवरून आणवणारे किस्से संभाषित होताना ती वेळही मंत्रमुग्ध होऊन गेली आणि आमची गाडी कधी आली ते कळलंच नाही.
सर्वांशी जुळवून घेताना भेदभावाचा लवलेशही न बाळगता सर्वांवर माया करणाऱ्या माझ्या माईने आज पन्नाशीचा टप्पा गाठला, त्या निमित्ताने तिला खूप खूप शुभेच्छा..!! तसेच "तेजस्वि नावधीतमस्तु:" या रुचेप्रमाणेच तिचे पुढील आयुष्य शैक्षणिक कार्यात तेजस्वी, उत्साह आणि प्रयोगशीलतेने ओतप्रोत, आणि माझ्या सारख्याच अनेकांच्या आयुष्यातील प्रेरणास्रोत बनून त्यांचे आयुष्य "स्फुल्लींगा" प्रमाणे तेजोमय करण्याचे प्रामाणिक व पवित्र कार्य तिच्या हातून सदैव घडू दे हीच गणपती बाप्पा आणि विठू माउली कडे इच्छा.
शेवटी एवढंच म्हणेन की,
"मागच्या जन्माची पुण्याई,
म्हणून तुझ्या पोटी जन्म झाला,
मायेच्या झऱ्यात तुझ्या,
हा केदार चिंब भिजुनी गेला. "
तुझाच ,
दादू.

Comments
Post a Comment