वाचनानुभव: "माझी जन्मठेप"



अखंड तेजाचा धगधगता अग्निकुंड, अचाट बुद्धीमत्ता, अफाट सामर्थ्याचे प्रतिक आणि मातृभूमी बद्दल असलेले प्रचंड प्रेम म्हणजेच विनायक दामोदर सावरकर.

वि. दा. सावरकर लिखित माझी जन्मठेप यामध्ये सावरकरांना झालेल्या अमानवी शिक्षेचे, अनुभवांचे तसेच इंग्रजांच्या क्रूर मनोवृत्तीचे दर्शन घडविणारे वर्णन केले आहे. काळे पाणी ही कादंबरी वाचल्यानंतर मी सावरकर लिखित पुस्तकांना वाचण्याचा सपाटा सुरु केला तसाही या पुस्तकाबद्दल मला आधीपासूनच आकर्षण होते. काही राजकीय पक्ष्यातील लोकांनी सावरकरांविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयन्त केला होता. अर्थात, अशाने महान व्यक्तिचे महत्व कमी होत नाही. अर्थातच पुलनी म्हटल्याप्रमाणे, सावरकरांचे विचार पचवणे अवघड आहे, त्याला सारासार विवेकबुद्धी आणि आकलन शक्ती हवी. माझ्या सारख्या शब्द किंकराने या पुस्तकाबद्दल लिहताना शब्द व भावना अपुऱ्या पडत आहेत.

वयाच्या २६ व्या वर्षी नाशिकच्या कलेक्टरच्या हत्येच्या कटामधे सहभाग असल्याच्या आरोपावरून ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा, तेही दूर अंदमानात. तिथेही एकत्र येऊन तुरुंगात होणाऱ्या अत्याचाराचा सामना त्यांनी केला. अतोनात शारीरिक परिश्रम व मानसिक खच्चीकरण होत असताना कैद्यांमध्ये शिक्षणाची, वाचनाची आणि देशप्रेमाची आवड निर्माण केली. सावरकरांनी अंदमानमध्ये भोगलेल्या कष्टाचे हृदयद्रावक वर्णन वाचणाऱ्याच्या हृदयाचा थरकाप उडविल्याशिवाय राहत नाही.

राष्ट्रभक्त, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान आणि धगधगते लेखन करणारे क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर यांनी १०,००० पेक्षा जास्त मराठी पाने व १५०० पाने इंग्रजी मध्ये लिहून ठेवली तसेच ६००० ओळींचं विख्यात काव्य निर्माण केलं. आताच्या आणि पुढील कित्येक पिढ्यांचा विश्वास बसणार नाही असे अंदमानातील सावरकरांचे जीवन, मातृभूमी बद्दलचे निस्वार्थी, निस्सिम प्रेम, त्यांची काव्य प्रतिभा,संघर्ष हे सारं प्रेरणादायी आहे. उद्देशाने झपाटलेले जगणं अनुभवायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.

Comments