वाचनानुभव: "मृत्युंजय"



जगातील सर्वात मोठं महाकाव्य म्हणजे महाभारत. महाभारतातील व्यक्तिरेखा मोजता मोजता भोवळ येते म्हणतात ते काही खोटे नाही. महाभारत म्हणजे प्रेम, लोभ, राजकारण, सत्ता, हिंसा, व्याभिचार, करुणा, दुःख, हट्ट असे जितके सारे वेगवेगळे मानवभाव असतील त्यांची सुरेख सांगड घातली आहे. या साऱ्या व्यक्तिरेखांच्या गोतावळ्यात उठून दिसते ती व्यक्ती म्हणजे कुंतिपुत्र, सुर्यपुत्र कर्ण. कर्णाची कहाणी वाचताना मला नेहमी “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख” गाण्यामध्ये संबोधलेल्या तळ्यातील त्या बदकांत हा राजहंस आयुष्यभर कसा राहू शकला हीच बाब बोचत राहते. वाटेवर चालताना लागलेली ठेच जितकं दुःख देते त्याहून अधिक दुःख तो दगड आपल्या आप्तस्वकीयांकडून ठेवला होता ही जाणीव कर्णाचे जीवन सतत करून देते.

शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय कादंबरीने कर्ण या नावाला एक वेगळीच ओळख मिळवून दिली आहे. त्यांनी कर्णास दिलेल्या उपमा काळीज हेलावून टाकतात . शिवाजी सावंत यांनी केलेल्या अनेक प्रसंग वर्णनाची अनुभूती तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. आणि म्हणतात ना "If you are a reader you can live thousands of life" त्याच प्रमाणे आपणही कर्ण होऊन जगतोय असच वाटायला लागतं.

ही गोष्ट आपल्याला एक त्यातलीच एक व्यक्ती सांगत आहे असे वाटून ती अजूनच आपलीशी वाटते. कधी कृष्ण, तर कधी कुंती यांच्या मुखातून महाभारतातील अनेक घटनांना उलघडत असताना प्रवाहातून येणाऱ्या एका विशिष्ट कर्णाच्या व्यक्तिरेखेचा फारच दिव्य आणि लोभस असा अनुभव येतो. लहानपणापासूनच शुल्लक वागणूक मिळालेल्या कर्णाचे अनेक चांगले गुण अगदी निखळ मांडले जातात. सतत दुर्लक्षित असल्याने जगाला आपलं नाण कस खणखणीत आहे हे दाखवण्यासाठी घेतलेली जीवापाड मेहनत तुम्हालाही एक नवीन ऊर्जा देते. ताकत, सत्ता आणि बुद्धी असूनही एका चुकीच्या निर्णयाचा काय परिणाम असू शकतो याचं उदाहरण म्हणजे राधेयाच जीवन. आई, तात, भाऊ, दुर्योधन, कृष्ण सगळ्यांवर जीव असणारा हा कर्ण आणि त्याची कहाणी हृदयद्रावक आहे. शिवाजी सावंत यांनी अगदी सुरेख लिहलेल्या या कादंबरीचे अनेक चाहते आहेत. अनेकांना पुस्तकांची आवड निर्माण करण्यात या कादंबरीचा मोठा हात आहे.

Comments